दुधाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास झाली सुरुवात; पहा किती मिळणार अनुदान आणि कोणाला मिळणार | Milk Anudan Yojana Maharashtra

Milk Anudan Yojana Maharashtra : पुणे जिल्ह्यातील दूध प्रकल्पांच्या अनुदान प्रक्रियेत रखडपट्टी झाल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील ११४ दूध प्रकल्पांपैकी अवघ्या ४ प्रकल्पांनी अनुदानासाठी प्रस्ताव दाखल केल्याची बातमी ‘सकाळ’मध्ये ५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य सरकारने यावर तातडीने कारवाई केली. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

शिरूर तालुक्यातील साई प्रसाद दूध प्रकल्पातील ५१३ शेतकऱ्यांना ११ लाख ७१ हजार रुपये, तर इंदापूर तालुक्यातील श्रीराम दूध प्रकल्पातील ६९ शेतकऱ्यांना ३ लाख २५ हजार रुपये असे एकूण ५८२ शेतकऱ्यांच्या खात्यावर १४ लाख ९६ हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे.

दुधाला ३.५ फॅट आणि ८.५ एस एन एफ असलेल्या दुधाला ३० रुपये दर आणि प्रति लिटर ५ रुपये अनुदानाची घोषणा राज्य सरकारने १ जुलै २०२४ पासून केली होती. मात्र, दोन महिने उलटूनही अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नव्हते. ‘सकाळ’ मध्ये बातमी प्रकाशित झाल्यानंतर शासनाने लक्ष घातले आणि काही दूध प्रकल्पांनी आपल्या प्रस्तावांना गती दिली. त्यामुळे आता अनुदानासाठी अर्ज दाखल करणाऱ्या प्रकल्पांची संख्या १८ वर पोहोचली आहे, मात्र अद्याप ९६ प्रकल्पांनी अनुदानासाठी प्रस्ताव सादर केलेले नाहीत.

शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी प्रकल्पांकडून प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

पुणे जिल्हा दूध विकास अधिकारी सतीश डोईफोडे यांनी सांगितले की, “आता दूध प्रकल्पांकडून माहिती सादर करण्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. ११४ प्रकल्पांपैकी १८ प्रकल्पांनी अनुदान मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. उर्वरित प्रकल्पांनी देखील प्रस्ताव दाखल करावेत, जेणेकरून कोणताही शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये.”

प्रकल्पांनी शेतकऱ्यांकडून अनुदानासाठी आवश्यक माहिती वेळेत सादर न केल्याने अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यात अडचण येत आहे. शासनाने शेतकऱ्यांना अनुदान देण्याची प्रक्रिया वेगाने करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही आपली माहिती वेळेत सादर करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.